कराड ग्रामीण भागात एक हजार यशवंत धान्य किटचे वाटप

 


कराड ग्रामीण भागात एक हजार यशवंत धान्य किटचे वाटप


कराड - कराड तालुक्यातील ग्रामीण भागात हातावर पोट भरणारी 936 कुटुंबे आढळून आली आहेत. सध्या कसल्याही प्रकारचे काम त्यांना नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता गृहीत धरून अशा कुटुंबांना यशवंत धान्य किट या नावाने एक हजार धान्याची पाकिटे पुरविण्यात येणार असल्याची माहिती कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांनी दिली. यावेळी उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांची उपस्थिती होती. 


कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. सुरक्षेच्या कारणावरून गेल्या दहा दिवसापासून कामबंद असल्याने रोजगार पूर्णतः बंद झाला आहे. सर्वच गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. गेल्या दहा दिवसापासून रोजी रोटीसाठी बाहेर पडणारी कुटुंब घरातच अडकून पडली आहेत. रोजगार थांबल्यामुळे मजुरावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता गृहीत धरून कराड तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील गाव वाडी वस्ती यांचा सर्वे करण्यात आला. ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड अथवा काही कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशी 936 कुटुंबे आढळून आली आहेत. 


सदर कुटुंबांना शासकीय अथवा सोशल सस्थाच्या माध्यमातून मदत मिळेलच परंतु, तोपर्यंत अशा कुटुंबाची उपासमार होऊ नये, म्हणून कराड पंचायत समितीच्या वतीने संबंधित कुटुंबांना धान्याची पाकिटे पुरवण्यात येणार आहेत. कराड पंचायतचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य,गटविकास अधिकारी तसेच शिक्षक, ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका, आरोग्य, कृषी सह अन्य विभगतील अधिकारी कर्मचारी यांचे मार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता सभापती व उपसभापती तसेच पंचायत समिती सदस्य यांनी एक महिन्याचे मानधन, अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार एकत्रित करून एकूण साडेसातशे रुपयाचे एक पाकीट. अशी 1000 पाकीट गरजू पर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. चवळी, तांदूळ, आटा, चहा पावडर, साखर, तेल, मीठ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा त्यामध्ये समावेश आहे. 


सदर धान्यांच्या पाकिटांचे वितरण ग्रामपंचायत मार्फत अथवा गाव पातळीवरती स्थापन करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कमिटी मार्फत करण्यात येणार आहे. पण कुणाला अशा कुटुंबांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनी धान्य पाकिटाच्या रुपाने मदत करावी. होलसेल दरातील या पाकिटाची किंमत साडेसातशे रुपये किंमत असेल. 


936 कुटुंबा मध्ये प्रत्येकी अन्य सदस्य धरले तर उपासमार होणारी सदस्य संख्या यांचा आकडा खूपच मोठा दिसून येईल. याकरिता खूप मोठी रक्कम आवश्यक आहे. यथावकाश अशी मदत कोणत्या ना कोणत्या मार्गाने संबंधित कुटुंबापर्यंत पोहोचेलच तोपर्यंत आपणही उचललेले एक पाऊल संबंधित कुटुंबासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. माणसावर आलेले संकट परतवून टाकण्यासाठी आपण आपल्यातली माणुसकी जागी ठेवूया, आणि या समाजकार्यात आपणही सहभागी होऊ. या याशिवाय अजून काही कुटुंबे असतील तर ती आमच्या लक्षात आणून द्यावीत असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, विस्ताराधिकारी जमीला मुलाणी, दीपक कराळे, जे जे साळुंखे, तसेच शिक्षक संघाचे प्रदीप रवलेकर, ज्ञानबा ढापरे, अरुण पाटील, प्रवीण लादे, गणेश जाधव, शिवाजी डी जाधव, एस बी जाधव, व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.


अधिक माहिती करता एन्. एस कोळी 9657110131, दीपक कराळे 9420818540, शिवाजी जाधव 9403772870 प्रदीप रवलेकर 9822320320 या नंबरवर संपर्क साधावा.