यशवंत बँकेची सामाजिक बांधिलकी..१००० च्यावर नागरिकांना अन्नधान्याची मदत


यशवंत बँकेची सामाजिक बांधिलकी..१००० च्यावर नागरिकांना अन्नधान्याची मदत


लॉकडाऊन काळात यशवंत बँकेचा मदतीचा चौकार...
आपत्तीकाळात जपला सामाजिक बांधिलकीचा वारसा...
१००० च्या वर नागरिकांना केली अन्नधान्याची मदत...


यशवंत बँकेने आपल्या बँकिंग व्यवसायाबरोबर नेहमीच राज्यात येणाऱ्या विविध आपत्तीकाळात अनेक सामाजिक उपकरण राबवून नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. भूकंप, वादळ, महापूर तसेच दुष्काळ परिस्थितीत नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून बँकेने बाधितांना मदत केली आहे.


कोरोना लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वांनाच बसला आहे. यात जास्त नुकसान झाले आहे ते मोलमजुरी, रोजंदारी करून पोट भरणाऱ्या स्थानिक व परप्रांतीय नागरिकांचे. व्यवसाय बंद असल्याने आर्थिक आवक थांबली व उपासमार सुरू झाली. यातील अनेकांकडे रेशनकार्ड नसल्याने शासकीय मदत त्यांना मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.


याचाच विचार करून यशवंत बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.शेखर चरेगांवकर याच्या कल्पक नेतृत्वाखाली अशा असंघटित व मदतीपासून वंचित नागरिकांना सहाय्य करण्याचा संकल्प बँकेने केला व तो पूर्ण केला.


यासाठी बँकेच्या सेवकांनी आपले १ दिवसांचे वेतन देऊ केले. समाजातील अनेक दानशूर दातृत्वांनी देखील या आवाहनास आर्थिक व वस्तूरूपाने मदत देऊन सहकार्य केले.


बँकेने तयार केलेल्या धान्य किटमध्ये २ किलो तांदूळ, २ किलो गहू, अर्धा किलो तूरडाळ, १ किलो तेल, २०० ग्रॅम चटणी व मीठ, तसेच २ मास्क अशा गोष्टींचा समावेश होता.
कराड शहर व परिसरातील सुमारे २०० गरजू कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोच करण्यात आली. यामध्ये व्यवसायासाठी आलेल्या ५० परप्रांतीय कुटुंबांचा देखील समावेश आहे.


याशिवाय काही संस्थांनाही मदत करण्यात आली. यामध्ये बनवडी भागात शिक्षणासाठी केरळ व तामिळनाडू राज्यातून आलेल्या १५० विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी ७५ किलो तांदूळ, ५० किलो बटाटे, ५ किलो तेल व १० किलो चटणी अशी मदत करण्यात आली.


कराडमधील वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळाच्या वेद पाठशाळेत असणारे १५ निवासी विद्यार्थी व त्यांची व्यवस्था पाहणाऱ्या कुटुंबांसाठी ५० किलो तांदूळ, १५ किलो गहू, २५ किलो बटाटे, १० किलो तेल व १० किलो चटणी असे साहित्य देण्यात आले.


याचबरोबर कराड जवळील वारुंजी, केसे व सुपने याभागात असणाऱ्या गुऱ्हाळांवर कामासाठी यवतमाळ, अमरावती येथून अनेक मजूर येत असतात. व्यवसाय संपल्याने व लॉकडाऊनमध्ये अडकल्याने त्यांची अडचण सोडवण्यासाठी त्यांना २५ किलो तांदूळ, १५ किलो बटाटे व ५ किलो चटणी देण्यात आली.


आजवर या मदतीसाठी अनेकांनी सहकार्य केले आहे. यामध्ये यशवंत कर्मचारी वर्ग, अनेक ग्राहक-सभासद, स्थानिक युवा उद्योजक व व्यापारी वर्गाने आपली आर्थिक व वस्तुरूप मदत केली आहे. याकामी पार्श्वनाथ पतसंस्था, श्रीकांत केळकर, मुकुंद चरेगांवकर, ज्ञानदेव राजपुरे, घन:श्याम पेंढारकर, नितीन वास्के व सदानंद कुलकर्णी यांचेही विशेष सहकार्य लाभले. सर्वांचा नामोल्लेख करता येणार नाही व त्यांनाही ते आवडणार नाही. या सर्वांना अनेक धन्यवाद.


या मदतीचा ओघ अद्याप सुरूच असून अनेकजण आपले योगदान याकरिता देत आहेत. आपले योगदान यात देण्यासाठी बँक प्रशासनाशी संपर्क साधावा. या संकटकाळी आपली मदत योग्य हाती पडत असल्याचे समाधान यशवंत बँक व्यवस्थापन मंडळास आहे. समाजातील अनेक स्तरातून या उपक्रमाचे कौतुक मान्यवर व नागरिक करीत आहेत.


- रुपेश कुंभार
विपणन, संशोधन व विकास अधिकारी
दि यशवंत को-ऑप. बँक लि.,