समाज असा कसा बिघडतो .....साधुसंतांचा जीव घेतो....


समाज असा कसा बिघडतो .....साधुसंतांचा जीव घेतो....


समूहाने राहणाऱ्या समाजामध्ये माणसात माणुसकी राहिली की नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 70 वर्षीय वयोवृद्ध साधूला काठ्या व दगडानी ठेचून मारणे हे कोणत्या माणुसकीचे दर्शन घडवले ? ज्यावेळेला समाज असे कृत्य करतो. त्यावेळेला तो नक्कीच माणसाच्या समूहांमध्ये मोडला जात नाही. तर नक्कीच तो राक्षसगणातील अथवा हिंस्त्र प्राणी जमातीतील मनोवृत्तीचा असावा हे मात्र निश्चित. संपूर्ण आयुष्य आपले साधू म्हणून व्यतीत करणाऱ्या 70 वर्षीय साधूला निर्घॄणपणे मारणे, त्यांची हत्या करणे,त्यांच्याबरोबर असणाऱ्या एका 40 वर्षीय साधू व गाडीच्या ड्रायव्हरला ही तितक्याच क्रॄरपणे मारणे, त्यांची जीवनयात्रा संपवणे. हा गुन्हा भिषण आहे. लोकशाहीमध्ये असणाऱ्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल. ही अपेक्षा आहे. दरम्यान साधूंना ज्या पद्धतीने मारले गेले त्याच पद्धतीने त्या समूहाला शिक्षा द्यावी का ? असा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


पालघरमधील एका गावाच्या वेशीत ही घटना घडली आहे.घटनेचे दृश्य पाहिल्यानंतर कोणत्याही माणसाचे हृदय पिळवटल्याशिवाय राहणार नाही. कारण माणसांचा समूह जनावरांनाही इतक्या क्रॄरपणे मारत नाही. अथवा त्याला देहदंड देत नाही. क्रॄरपणे दोन साधू, एका ड्रायव्हरला मारण्याचे कृत्य झाले आहे. वास्तविक पाहता या घटनेची चौकशी होईल आणि या घटने मागील खरेसत्य समोर येईल. मानवतेला तर काळींबा आहेच. माणुसकी संपली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्र साधू संतांची भूमी असणारा प्रदेश आहे. अशा साधुसंतांच्या भूमीमध्ये साधूंची हत्या होणे, तीही अतिशय क्रॄरपणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे कृत्य आहे. मुळातच "साधूंची हत्या" ही घटना मूल्यता चुकीचे आहेत.


घटनास्थळी पोलिस उपस्थित होते. पोलिसांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांनी या दोन साधूंचा जीव वाचवणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. सरद घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, सत्तर वर्षाचा साधू दीनवाणीपणे पोलिसाच्या आडोशाला दडून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस त्या साधूंचे कोणतेही रक्षण करीत नाही. तर समूहाच्या स्वाधीन साधूला करीत असल्याच्या व्हिडिओ पाहता निदर्शनास येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर पोलिसांना निलंबित केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. सदर घटनेची चौकशी करण्याची हमी दिली आहे. पालघरमधील त्या परिसरामध्ये काही दिवसापासून किडनी चोरी करण्यासाठी टोळी कार्यरत असल्याच्या गैरसमजातून साधूंची हत्या झाली असल्याचे सांगितले जात आहे. गैरसमज होता तर साधूशी बोलून त्यांची बाजू समजून घेता आली असती. खरेच हे किडनी चोरी प्रकरणातील कोण संशयित आहेत का ? याची खातरजमा करण्याला संधी होती. असे याठिकाणी काहीही झालेले नाही हे प्रथम दर्शन दिसून येत आहे.


वास्तविक पाहता पोलिसांनी बजावलेली भूमिका मुळात संशयास्पद आहे. पोलिसांनी या दोन साधुसंतासह ड्रायव्हरला वाचवणे अपेक्षित होते. यांसाठी पोलिसांनी काही प्रयत्न केला नाही. कितीही मोठा समूह असला अथवा तो संतप्त झालेला असला तरी पोलिसांच्या पुढे तो टिकाव धरू शकत नाही. हे आत्तापर्यंतच्या अनेक घटनांवरून स्पष्ट झालेले आहे. मग साधूंच्या हत्या होताना "हे" पोलीस का बघ्याची भूमिका घेत होते ? याची कसून चौकशी झाली पाहिजे. जनतेचे रक्षण करणे हे मुळात पोलिसांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी असणाऱ्या कर्तव्यात कसूर पोलिसांनी केल्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्याचबरोबर जितक्या लोकांचा समूह होता, त्यातील एकालाही यातून सुटका मिळता उपयोगाची नाही. अथवा त्याला सूट देता उपयोगाचे नाही. जर का ते दोनशे अथवा दोनशेपेक्षा अधिक असतील तर सरसकट सर्वांना या कुकर्माची व साधुसंतांच्या हत्येया घटनेतील आरोपी म्हणून गजाआड करून शिक्षा झाली पाहिजे. 


साधूंची झालेल्या हत्येबाबत समाजमन संतप्त आहे. "कोरोना" सारखा व्हायरससोबत देशभर लढा सुरू असताना सध्या लोकशाही मार्गातील कुठलाही मार्ग साधूंच्या आखाडयांनी अवलंबविला नाही. साधूंच्या आखाड्यातील अनेक साधू या घटनेमुळे संतप्त आहेतच. मानवता कोणत्या थराला गेली हे पाहून सुन्न झाले आहे. दोन साधुंचा अंत झाला आहे. राहिले ते साधुंचा अंत करणारे आरोपी. "साधूंसंत येती घरा तोची दिवाळी दसरा" म्हणण्याची थोर परंपरा आपली आहे. आता समाजानेच साधूंची हत्या केल्यानंतर काय म्हणायचे ?