सातारा जिल्ह्यात ५२ हजार १८४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप.... स्नेहा देवकाते

सातारा जिल्ह्यात ५२ हजार १८४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप.... स्नेहा देवकाते


सातारा :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून  1 ते 5 एप्रिल अखेर जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 19 शिधापत्रिकाधारकांना तब्बल ५२ हजार १८४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.


 राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 17 लाख 78 हजार 388 आहे.  सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा या लाभार्थ्यांना सातारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांद्वारे लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत  २ रुपये किलो दराने प्रति कार्ड 25 किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड 1० किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदुळ दिला जातो.


सातारा जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे ३१ हजार ६४४ क्विंटल गहू, २० हजार ५४० क्विंटल तांदूळ, तर १०१ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे सातारा जिल्ह्यात अडकलेल्या शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने त्यांचे आधार नंबर व १२ अंकी शिधापत्रिका नंबर यांची खात्री करून अन्नधान्य देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.