पोलीसही माणूस याचे भान जनतेने ठेवावे- आ. शिवेंद्रसिंहराजे 


पोलीसही माणूस याचे भान जनतेने ठेवावे- आ. शिवेंद्रसिंहराजे 


सातारा- जगभरात कोरोना विषाणूच्या महामारीने हाहाकार उडाला आहे. आपल्या देशात आणि खास करून महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनापासून बचावासाठी जिल्हा प्राशासन आणि जिल्हा पोलीस दल दिवसरात्र आटोकाट प्रयत्न करून जनतेचे रक्षण करत आहे. कोरोना कोणालाही होऊ शकतो, अशा गंभीर परिस्थितीतही पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी अहोरात्र रस्त्यावर उभा असलेला पोलीस हा देखील एक माणूसच आहे, याचे भान जनतेने ठेवावे आणि या आपल्या बांधवांच्या आरोग्याची काळजीही जनतेने घ्यावी, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 


केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार सातारा जिह्यातही लॉक डाऊन सुरु असून अशा गंभीर परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडून पोलीस जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. पोलिसांना  कोरोना होण्याचा जास्त धोका असून कोरोनापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेले हॅन्ड सॅनिटायझर कारखान्याच्यावतीने मार्गदर्शक संचालक आ.  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा पोलीस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते यांना  भेट देण्यात आले. याप्रसंगी जनतेला आवाहन करताना आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी, फिरोज पठाण आदी उपस्थित होते. 


संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉक डाऊन घोषित केला असून त्याची अंमलबजावणी पोलीस दलामार्फत केली जात आहे. एकमेकांच्या संपर्कात न येणे, गर्दी न करणे हेच उपाय कोरोनापासून आपल्या सर्वांचे संरक्षण करणार आहेत. त्यासाठी पोलीस यंत्रणा दिवस रात्र झटत आहे. पोलीस आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत. पोलीस हा सुद्धा माणूसच आहे आणि त्यालाही कुटुंब आहे. त्यामुळे आपल्या पोलीस बांधवांची काळजी घेणे हि आपली सर्वांचीच सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे संचारबंदीचे कोणीही उल्लंघन करू नये. आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. कोणीही गर्दी करू नये. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये आणि कोरोना विरोधातील लढाई जिकंण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. 


जातीय तेढ निर्माण करू नका 


कोरोना हे जगावर आलेले भयंकर संकट आहे. आपल्या देशातही कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोना जात-पात, धर्म, गरीब- श्रीमंत असा भेदभाव करत नाही. त्यामुळे कोना एका व्यक्तीला अथवा धर्माला कोरोनासाठी जबाबदार धरणे योग्य नाही. कोरोनाला लढत द्यायची असेल तर ती एकजूटीनेच दिली जाऊ शकते. त्यामुळे कोणीही जातीय तेढ निर्माण करू नये. आपण सर्वांनी एकोप्याने राहून कोरोनाला हरवायचे आहे, एवढच सर्वांनी लक्षात ठेवावे आणि घरात राहून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यास प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.