"रक्षक क्लिनिक"चा लोणंद पॅटर्न : "तुमच्या आरोग्याचे आम्ही रक्षण"
कोरोना संसर्गाने जगभर मोठा हाहाकार माजवला आहे. आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात संसर्ग सुरु आहे. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन आहोरात्र काम करत आहे. लोकांनी भिती न बाळगता, घरात बसून पूर्ण दक्षता घ्यावी याचे आवाहन वारंवार केले जात आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या आहेत. त्यात रुग्णालय आणि मेडिकल हे अत्यंत महत्वाचे आहे. या गोष्टीची जाणिव ठेवून लोणंद ता. खंडाळा जि. सातारा येथील 80 डॉक्टर आणि निरा येथील 20 डॉक्टर्सनी मिळून ‘रक्षक रुग्णालय’ ही अभिनव संकल्पना राबविली आहे. त्या संदर्भात डॉ. मिलींद काकडे यांच्याशी संवाद साधून हा लोकोपयोगी आणि डॉक्टरांच्याही सुरक्षेला प्राधान्य देणारी संकल्पना काय आहे त्याचा घेतलेला हा वेध…
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये सर्वसामान्य जनतेला सुरक्षीत दृष्टया आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी लोणंद मेडिकल असोसिएशनचे डॉ. मिलींद काकडे व इंडियन मेडिकल असोसिएशनचे निरा शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी संयुक्त विद्यमाने लोणंद परिसरातील 100 डॉक्टारांना एकत्र करुन श्री सिद्धीविनायक हॉस्पिटल, निरा रोड, लोणंद येथे रक्षक क्लिनिक सुरु केले आहे. हे ‘रक्षक’ क्लिनिक लोणंद परिसरातील नागरिकांसाठी संजीवनी ठरत आहे.
या रिक्षा क्लिनिकमध्ये लोणंद व लोणंद परिसरातील नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, घश्यात दुखणे, दम लागणे इत्यादी आजरांवर तपासणी करुन औषधोपचार करत आहेत. या क्लिनिकच्या माध्यमातून सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचे काम करीत आहेत. तसेच दररोज येणाऱ्या रुग्णांना कोणता आजार आहे, त्याचबरोबर प्रत्येक दिवशी किती रुग्णांनी रक्षक क्लिनिकमध्ये येऊन तपासणी व औषधोपचार करुन घेतले याची सर्व माहिती रोजच्या रोज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला देण्यात येत आहे.
या रक्षक क्लिनिकमध्ये लोणंद व लोणंद परिसरातील सर्व सर्दी, ताप, खोकला, दम लागणे इत्यादी संभावित कोरोनाचे लक्षण असणाऱ्या रुग्णांची शंभर डॉक्टर एकत्र येवून रोटेशन पद्धतीने सुरक्षीत तपासणी करीत आहेत. हे रक्षा क्लिनिक जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी संगिता चौगुले व तहसीलदार दशरथ काळे या विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेले हे रक्षक क्लिनिक अर्थात सुरक्षा आपल्या सर्वांची हा महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प ठरत आहे. यामुळे सर्व डॉक्टारांच्या मनातील भितीचे वातावरण कमी होवून, डॉक्टर व पेशंट दोघांनाही सुरक्षा मिळणार आहे, असे लोणंद -निरा इंडियन मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत हे सांगतात.
लोणंदच्या रक्षक क्लिनिकचा डंका राज्यात वाजत असून लोणंदच्या रक्षक क्लिनिकचा “लोणंद पॅटर्न” राज्याने स्वीकारलेला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्षक क्लिनिक उपक्रमाचे कौतुक केले असून अशा प्रकारचा उपक्रम राज्य शासनही राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोराना विरोधात आपण सर्व जण मिळून लढा देवू आणि जिंकूही या ब्रीदवाक्यानुसार डॉ. नितीन सावंत व मिलिंद काकडे यांचे सर्व सहकारी कोरोनाच्या संकटात देवदूतासारखे काम करीत असून लोणंद व लोणंद परिसरातील नागरिकांसाठी रक्षक क्लिनिक संजीवनी ठरत आहे, त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा.
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा