कोरोना’च्या पराभवासाठी...आमचा ‘बारामती पॅटर्न’…!


कोरोना’च्या पराभवासाठी...आमचा ‘बारामती पॅटर्न’…!


  पुणे  : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, बारामतीतही सहा कोरोनाचे रुग्ण सापडणं ही बातमी प्रत्येक बारामतीकरासाठी धक्कादायक होती. त्यातही एका रुग्णाचा झालेला मृत्यू बारामतीकरांना हादरवून गेला.  बारामतीच्या विकासाचा पॅटर्न राज्यात, देशात आजवर गाजत आला, परंतु त्याला कोरोनामुळे धक्का बसेल की काय अशी चिंता सगळ्यांनाच वाटत होती. परंतु ही चिंता अल्पकालीन ठरली कारण, राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सूत्रं हाती घेतली आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईची चक्र वेगानं फिरली. धडाक्यात निर्णय झाले आणि त्यापेक्षा वेगानं त्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.


बारामती शहरातल्या लॉकडाऊनमध्ये कुणी काय करायचं. अन्नधान्य, खाद्यपदार्थ, दूध, भाजीपाल्याचा पुरवठा कसा करायचा याचं संपूर्ण नियोजन आज झालं आहे. कुणी म्हणतं, राजस्थानातल्या भिलवाडा पॅटर्नप्रमाणे आज बारामतीत कोरोनाविरुद्धची लढाई सुरु आहे. परंतु खरं सांगायचं तर, भिलवाडा पॅटर्नला मागे टाकून आज शहराची वाटचाल स्वतंत्र बारामती पॅटर्नकडे सुरु आहे.


            शहरात बारामती पॅटर्नची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून शहर अगदी शांत आहे… रस्त्यावर कुणीही दिसत नाही. लॉकडाऊनचा कालावधी वाढला असूनही, ना कोणत्या दुकाना समोर रांगा… ना कुठे भाजी खरेदीला गर्दी… सगळी दुकानं कडकडीत बंद… अशा परिस्थितीत सामान्य बारामतीकर कसे शांत, असा प्रश्न सर्वांना पडू शकतो. मात्र हे शक्य झालं आहे, करोना विरुध्द लढण्यासाठी तयार केलेल्या ‘बारामती पॅटर्न’मुळे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शन आणि सूचनेनुसार हा ‘बारामती पॅटर्न’ राबविला जात आहे.  


            ‘कोरोना’ने संपूर्ण राज्याला विळखा घातलेला असताना बारामती शहरातही ‘कोराना’ने शिरकाव केला असला तरी कोरोनाला हरवण्याचा अनोखा ‘बारामती पॅटर्न’ शहरानं शोधला आहे. आज संपुर्ण बारामती शहर सील करण्यात आले आहे. नागरीकांना हव्या असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू त्यांना एका ‘एसएमसएस’वर अगदी दारातच मिळत असल्याने कुणीही घराबाहेर पडायचा प्रश्नच नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय आहे, याचं भान लोकांना आलंय. गरजा घरातच पूर्ण होत असल्याने आता बारामतीत शंभर टक्के लॉकडाऊन आहे. ‘कोरोना’ला हरवायला ‘बारामती पॅटर्न’ची मात्रा लागू पडत असल्याचं सकारात्मक चित्र सध्या दिसत आहे.  


काय आहे बारामती पॅटर्न…


            कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘बारामती पॅटर्न’ तयार करण्यात आला आहे. ‘बारामती पॅटर्न’ हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, विक्रेते, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या समन्वयातून काम करण्याचं यशस्वी मॉडेल आहे. यामध्ये राज्यशासनाच्या सर्व विभागांबरोबरच बारामती नगरपालिकेचाही महत्वाचा सहभाग आहे. बारामती नगरपालिकेचे नगरसेवक, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांचाही यात सहभाग आहे. बारामती शहरात 44 वॉर्ड आहेत. या प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकांसोबत शासनाचे एक मदत सहायता अधिकारी, एक पोलीस अधिकारी, विक्रेते, दहा स्वयंसेवक काम करत आहेत. या सर्वांचे संपर्क क्रमांक संबंधित वॉर्डमधील लोकांपर्यंत पाहोचविण्यात आले आहेत. यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य, दुध, गॅस सिलेंडर, फळे व भाजीपाला यांची यादी त्यांच्या वॉर्डातील संबंधित लोकांच्या मोबाईल टाकल्यावर काही कालावधीतच अगदी दारात नागरिकांना या वस्तू मिळत आहेत.


ॲपच्या एका क्लिकवर ऑर्डर…


            प्रशासनाकडून एका मोबाईल ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे. हा ॲप आपल्या मोबाईलवर सहज डाऊनलोड करता येतो. या ॲपवरही नागरिकांना आपल्या आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची यादी टाकता येते. त्यावर यादी टाकल्यावर काही वेळातच नागरिकांना अगदी दारातच वस्तू आणि भाजीचा पुरवठा होत आहे. या ॲपलाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे. त्याचबरोबर नागरिकांना विविध तक्रारी मांडण्यासाठी सुध्दा स्वतंत्र ॲपची निर्मिती प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. 


माफक दरात भाजी आणि दूध…


            सामान्य नागरीकांसाठी किराणा मालाबरोबरच भाजी आणि दूधाची आवश्यकता असते. त्यासाठी प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांशी समन्वय साधून अत्यंत माफक दरात भाजीची उपलब्धता केली आहे. त्यासाठी भाजीचे अवघ्या 35 रुपयांचे किट तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये वांगी, टोमॅटो प्रत्येकी अर्धाकिलो, 1 किलो कोबी, 1 कोथिंबीरीच्या जुडीचा समावेश आहे. त्याचबरोबर आठवड्याच्या भाजीच्या तीनशे रुपयांचे किटही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या शिवाय अधिकची भाजी हवी असल्यास मागणी नोंदविताच भाजी उपलब्ध करुन दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही बाजारपेठ मिळाली आहे. तसेच दूधचाही मागणीनुसार पुरवठा केला जातो. निर्जंतुकीकरण करुनच किराणामाल, भाजी, दूधाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 


संपूर्ण शहर सील…


            कोरोनाला हरवायचं असेल तर कोरोनाची संपर्क साखळी  तोडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी बारामती शहर पूर्णपणे सील करण्यात आले आहे. शहरात अत्यावश्यक सेवांसाठी पोलीसांच्याकडून डिजीटल पास देण्यात आले आहेत. पोलिसांसाठी 'कोरोना वॉरिअर', वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 'कोरोना फायटर' आणि स्वयंसेवक-सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी 'कोरोना सोल्जर' आशा तीन प्रकारच्या, तीन वेगवेगळ्या रंगाच्या पासची व्यवस्था करण्यात आली आहे. विनापरवाना फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक चौकात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरात अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक निर्बंध आले आहेत. 


परप्रांतियांनाही निवारा…


            बारामतीत कामाच्यानिमित्तानं आलेल्या परप्रांतिय कामगारांनाही निवारा. रोजच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करुन देण्यात आली आहे. यासाठी तीन निवारा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 


रेशनच्या धान्याचे 90 टक्के वाटप…


राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी सवलतीच्या दरात देण्यात आलेल्या रेशनच्या धान्याच्या वितरणाची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत आहे. शहरातील 48 रेशन दुकानदारांमार्फत घरपोच रेशनचे धान्य पोहोचविण्याचे काम केले जाते. आतापर्यंत 90 टक्के कुटुंबापर्यंत रेशनच्या धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. 


आरोग्य विभागही सज्ज…


            बारामतीमधील आरोग्य विभागही सज्ज झाला आहे. बारामती नगरपरिषद व आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधित क्षेत्रात एकूण 246 टीम तसेच ग्रामीण भागासाठी 28 टीम तयार करण्यात आल्या आहेत. यांच्यामार्फत दररोज सर्व्हे करण्यात येत आहे. संस्थात्मक अलगीकरणाच्या 1 हजार 599 खाटांची व्यवस्था आहे तर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, सुपा, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरणाच्या 118 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी वैद्यकीय व्यवसायिकांच्याकडील विलगीकरणासाठी 193 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आयसीयूत 89 खाटांची क्षमता आहे. शहरातील 92 जणांना होम क्वॉरंन्टाईन करण्यात आले आहे. या होम कोरोन्टाईन लोकांचीही नियमित तपासणी करण्यात येत आहे. 


            एकाचवेळी सर्वच पातळीवर सर्वांशी समन्वय राखत उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटायला तर मदत होत आहेच. त्याचबरोबर  करोनाबाधित रुग्णांपर्यंत किंवा संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे बारामतीमधील करोना रुग्णांच्या संख्येत अजून तरी वाढ झालेली नाही. कोरोनाचा संसर्ग रोखून रुग्णसंख्या थांबवण्यात बारामतीकर नक्की यशस्वी होतील, याबाबत सर्वांना विश्वास आहे. करोनाशी लढण्याचा  हा ‘बारामती पॅटर्न’ इतरांसाठीही मार्गदर्शक, आदर्श आहे.