सत्यजितसिंह पाटणकर यांनी घेतली कोरोना आव्हान तयारीची माहिती
पाटण - कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटाला तोंड देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाटण तालुक्यात केलेल्या उपाययोजनांची राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत गटविकास अधिकारी सौ. मिना साळुंखे व उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात हे उपस्थित होते.
रोगराई पसरू नये यासाठी पुरेशी स्वच्छता ठेवावी, मुंबई-पुणे येथून गावी आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करावी, कोरानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधांची व्यवस्था करावी तसेच लॉकडॉऊनमुळे कोणीही गरीब उपाशी राहणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यावी, असे पाटणकर यांनी यावेळी सांगितले. या कामी शासनास सहकार्य करणाऱ्या विविध अशासकीय तसेच सामाजिक संस्थाशीदेखील समन्वय राखावा असेही त्यांनी सांगितले.
कामगारांना, विशेषतः रोजंदारीवर पोट भरणाऱ्या मजुर कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी जेणेकरून त्यांच्या कुटुंबांची उपासमार होणार नाही असे पाटणकर यांनी यावेळी सांगितले. पाटण तालुक्यातील आरोग्य सेवक, पोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षिततेचीदेखील प्रशासनाने पुरेशी खबरदारी घ्यावी तसेच या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वैयक्तिक सुरक्षा कीट शासानाकडून उपलब्ध करून देण्यात यावीत असेही यावेळी ते म्हणाले. पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी केलेली व्यवस्था, रुग्ण तपासणीची क्षमता, विलगीकरणाची सुविधा, व्यक्तिगत सुरक्षेसाठी आवश्यक किट्सची उपलब्धता याबाबत पाटणकर यांनी माहिती करून घेतली.