कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा..वेळापत्रक नव्याने जाहीर होणार : मंत्री उदय सामंत
मुंबई, - राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
श्री. सामंत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
श्री. सामंत म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी संगितले.