अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती


अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती


सातारा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्‍या हॅन्ड सॅनिटायझरला प्रचंड मागणी वाढल्याने बाजारात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी त्याची चढ्या दराने विक्री केली जात असल्याने सर्वसामान्यांना हॅन्ड सॅनिटायझर मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर तोडगा म्हणून आणि केंद्र शासनाच्या आवाहनानुसार आता शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कोरोना विरोधातील लढ्याला हातभार लागेल असा विश्वास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. 


कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. शिवाय लोकांनी स्वयंस्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी हॅन्ड वॉश, साबण अथवा हॅन्ड सॅनिटायझरने नियमितपणे हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. पण हॅन्ड सॅनिटायझरची प्रचंड मागणी वाढल्याने, बाजारात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत साखर कारखान्यांनी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन घ्यावे यासाठी शासनस्तरावरून आवाहन करण्यात आले होते.


या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याची तयारी दर्शवित शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार शासनाच्या अन्य व औषध प्रशासनाकडून कारखान्यास नुकतेच परवानगीचे पत्र देण्यात आलेे. त्यानंतर कारखाना प्रशासनाकडून हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार तयार करण्यात येणारे हे हॅन्ड सॅनिटायझर लवकरच बाजारात उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले. तसेच कारखान्याचा चालू गळीत हंगाम आणखी एक महिना चालू राहणार असल्याने कामावर येणाऱ्या कामगार- कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी येताना आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हॅन्ड सॅनिटायझर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत असून कर्मचारी, अधिकारी व कामगारांना कोरोनापासून संरक्षण देण्याची पूर्ण काळजी व्यवस्थापनाकडून घेतली जात आहे.


दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगारांना मास्क आणि हॅन्ड वॉश उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच कारखान्यावर येणारे ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहन चालक, क्लिनर, वाहन मालक, तोडणी मजूर यांनाही वेळोवेळी विनामूल्य हॅन्ड सॅनिटायझर दिले जात असून कारखान्यावर येणाऱ्या प्रत्येकाला कोरोनापासून संरक्षित ठेवण्यासाठी सूचित केले जात असल्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी यावेळी सांगितले.