आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत
मुंबई - आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठांनी विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या 27 विद्यार्थ्यांना आईवडिलांकडून परवानगी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा एनएसएसचे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी घेता येतील का, यासाठीचा अहवाल सादर करावा आशा सूचनाही श्री. सामंत यांनी कुलगुरूंना केल्या.
मुंबई विद्यापीठाकडून ऑनलाईन समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवेला सुरूवात
कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यांना चिंता, अनिश्चितता, निराशा, सामाजिक विलगीकरण आणि असुरक्षितपणाचा सामना करणे कठीण जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लोकांच्या मानसिक आरोग्यावर आणि धोक्यामध्ये वावरणाऱ्या लोकसंख्येवर कोरोनाचा प्रभाव नोंदवून त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेऊन कोव्हिड १९ च्या उद्रेकाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाने ऑनलाइन मानसिक आरोग्य सहाय्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ही समुपदेशन सेवा वेब-आधारित स्वरूपात दिली जात आहे.
विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर यांनी ही ऑनलाईन समुपदेशनाची संकल्पना आखली आहे. विभागातील सर्व प्राध्यापक समुपदेशन कार्यक्रमाचा भाग असून, डब्ल्यूएचओ, एपीए आणि अन्य व्यावसायिक मार्गदर्शक तत्त्वे वापरून विभागाने एक कोव्हिड १९ समुपदेशन प्रोटोकॉल विकसित केला आहे. अशा प्रकारे इतर विद्यापीठांनीही सुविधा सुरू करावी असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी
कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठातील कर्मचारी/ अधिकारी त्यांचे एक दिवसाचे वेतन कोव्हिड १९ च्या निराकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आवाहनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी केले आहे.