बाहेरगावाहून आलेल्या सर्वांनी शासकीय यंत्रणेकडे नोंद करावी : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई


बाहेरगावाहून आलेल्या सर्वांनी शासकीय यंत्रणेकडे नोंद करावी : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई


कराड - कोरोना आजाराच्या कठीण परिस्थितीत बाहेरगांवाहून पाटण मतदारसंघात एकूण ६० हजारांहून जादा नागरिक मुंबई,पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत. बाहेर गावाहून आलेल्या बहुतांशी लोकांनी आपण मुळ गावी आलो असल्याच्या नोंदी प्रशासनाकडे केल्या आहेत. परंतू अद्यापही काही लोकांनी आपण मुळ गावी आल्याच्या नोंदी प्रशासनाकडे केल्या नाहीत.नोंदी न केलेल्या लोकांनी लवकरात लवकर या नोंदी तालुका प्रशासनातील संबधित अधिकाऱ्यांकडे कराव्यात असे जाहीर आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी लेखी पत्राव्दारे पाटण मतदारसंघातील बाहेरुन आलेल्या लोकांना केले असून हे पत्र सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झाले असून हा संदेश त्यांनी सातारा जिल्हयात बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक नागरिकांला दिला आहे.


सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या लेखी पत्रामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सातारा जिल्हयामध्ये तसेच पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरामधून बाहेर गांवाहून आपआपल्या मुळ गांवी आलेल्या लोकांना, नागरिकांना,महिलांना आणि युवकांना केलेल्या जाहीर आवाहनामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपणांस नम्र आवाहन करतो  की, कोरोना विषाणूच्या संकटापासून बचाव करण्याकरीता आपण मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून आप-आपल्या मुळ गावी  आला आहात. त्याबद्दल आपले स्वागतच आहे, या सर्व संकटाच्यादृष्टीने बाहेर गावाहून आलेल्या बहुतांशी लोकांनी आपण मुळ गावी  आलो असल्याच्या नोंदी गाव प्रशासन,तालुका प्रशासनचे संबधित पोलिस पाटील,ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचेकडे केल्या आहेत. 


परंतू अद्यापही काही लोकांनी आपण मुळ गावी आल्याच्या नोंदी संबंधित वरील प्रशासनाकडे केल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. मी आपणांस या पत्राव्दारे विनंती करतो की, बाहेर गांवाहून आलेल्या लोकांनी आपण ज्या गांवामध्ये आलो आहोत त्याची नोंद संबधित प्रशासनाकडे तात्काळ करुन घ्यावी जेणेकरुन कोरोना संसर्गाच्या संकटाचा सामना करण्याकरीता प्रशासनाला याची मदत होईल कळावे धन्यवाद असे जाहीर आवाहन करुन त्यांनी घरी रहा, सुरक्षित रहा अशीही विनंती केली आहे. ना.शंभूराज देसाईंचे सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झालेले लेखी पत्र हे केवळ पाटण मतदारसंघातील जनतेला आवाहन नसून त्यांनी सातारा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील बाहेरगांवाहून आलेल्यांना एक संदेश या पत्राच्या निमित्ताने दिला आहे.