वाहन व्यवसायिकांना सरकारने मदत करावी...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
कराड - गेली दोन वर्षे आर्थिक मंदिने अडचणीत सापडलेल्या एक्साव्हेटर जेसीबी ,पोकलेन ,डंपर, ट्रक इत्यादी वाहन व्यवसायिकांचे आर्थिक मंदिने खूप हाल सुरू असून अगोदरच बेरोजगारीचे संकट आहे. त्यात कोरोना महामारीची आपत्ती आल्याने ऐन "सिझन" मध्ये सध्या व्यवसायिकांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाडच कोसळली आहे. राज्यशासनाने या वाहन व्यवसायिकांना मदत करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे.
वाहन व्यवसायामध्ये प्रामुख्याने नोकरी न मिळालेले तरुण कर्ज काढून या व्यवसायात करीत आहेत. परंतु या आणीबाणीजन्य परिस्थितीत व गतवर्षी जादा झालेल्या अतिवृष्टीने वाहन व्यवसायिकांना कामच नाही. त्यात आर्थिक मंदी असलेने नवीन काही कामे सुरु नाहीत. तसेच कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण सिझन वाया गेला आहे. पावसाळा जवळ आला आहे. लाॅकडाऊन उठणार तोच पावसाळा सुरू होणार व जनजीवन पूर्ववत होईपर्यंत संपूर्ण "वर्किंग सिझन " वाया जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाहन व्यवसायिकांना केंद्र व राज्यसरकारने आर्थिक मदत करावी. त्यासाठी वाहन टॅक्स यामध्ये पेंडिंग किमान दोन ते तीन वर्षांचा वाहन कर माफ करावा. बेकारीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे बऱ्याच व्यवसायिकांना बँकेचे हफ्ते सुद्धा भरणे अवघड झाले आहे. सदर हफ्त्यावर बँका, पतसंथा, फायनान्स कंपन्या व्याजाबरोबर दंड सुद्धा आकारत आहेत. त्यात आरबीआयने सध्या कर्ज हफ्ते वसुलीला स्थगिती दिली असली तरी बँकांनी सदर हफ्त्यावर दंड कायम ठेवला आहे. असा अनुभव व्यवसायिकांना येत आहे. यामध्ये शासनाने सवलत द्यावी.
वाहन व्यवसायात वाहन धारकांना काम नाही. परंतु ड्रायव्हर, ऑपरेटर, क्लिनर यांना काम न करता पगार देण्याची वेळ आली आहे. तसेच स्पेअरपार्टच्या वाढलेल्या किमती, त्यावर असणारा जिएसटी देखील जादा आहे. तसेच डिझेल,ऑइल व स्पेअरपार्टचे दर गगनाला भिडले आहेत. या सर्वांमुळे वाहन व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. यासाठी वाहन उद्योजकांना आर्थिक मदतीचे धोरण सरकारने ठरवावे. आणि मदतीसाठी निर्णय घ्यावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सरकार लघु उद्योगांना मदत करणार आहे. त्यामध्ये वाहन व्यवसायिकांचा समावेश करावा. वाहन व्यवसायिकांनी आपल्या मागण्या लोकप्रतिनिधी, सरकार दरबारी मांडल्या आहेत. त्याचबरोबर वाहन व्यवसायिकांनी सरकारने मदत करावी यासाठी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांचे मार्गदर्शना खाली, युवक काँग्रेसच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहितीही ही सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.