घाबरु नका, प्रशासन तुमची काळजी घेण्यास सतर्क आहे,स्वत:ची काळजी घ्या : ना.शंभूराज देसाई


घाबरु नका, प्रशासन तुमची काळजी घेण्यास सतर्क आहे,स्वत:ची काळजी घ्या : ना.शंभूराज देसाई


 कराड - पाटण विधानसभा मतदारसंघातील चाफळ विभागातील डेरवण गांवामध्ये १० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने या विभागात खळबळ माजली असून आज मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी चाफळ विभागात येवून येथील पोलीस औटपोस्टच्या प्रांगणात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करुन विभागातील डेरवण,वाघजाईवाडी व माथणेवाडी या गांवाची सर्व अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पहाणी केली.यावेळी त्यांनी या गांवातील तसेच या गांवाच्या परिसरातील नाकाबंदी करण्यात आलेल्या एकूण ९ वाडयावस्त्यांतील जनतेला घाबरुन जावू नका,ही परिस्थिती आटोक्यात येईल,तुमची काळजी घेण्याकरीता मी स्वत: तसेच तालुका प्रशासन सतर्क आहे, तुम्ही गावकऱ्यांनी घराच्या बाहेर पडू नका,जीवनावश्यक वस्तू तुमच्यापर्यंत पोहचविण्याची तसेच तुमच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत तुम्ही सर्वजण तुमची स्वत:ची काळजी घ्या असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जनतेला या पहाणी दरम्यान केले.


          चाफळ विभागातील डेरवण गांवामध्ये १० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण झाली असून या मुलाच्या तसेच त्याच्या कुटुंबिंयाच्या संपर्कात आलेल्या एकूण ४५ लोकांना तपासणीकरीता कृष्णा रुग्णालय येथे काल दाखल करण्यात आले असून यापार्श्वभूमिवर मतदारसंघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी आज चाफळ येथे येवून सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्याबरोबर चर्चा केली व त्यानंतर त्यांनी या विभागातील डेरवण, वाघजाईवाडी, माथणेवाडी या गांवाची प्रत्यक्ष पहाणी देखील केली यावेळी त्यांच्यासमवेत प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,उंब्रजचे सहा.पोलिस निरिक्षक अजय गोरड यांची उपस्थिती होती.


           प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांनी डेरवण गावाच्या आसपासच्या ०३ किमी व ०७ किमी अंतरातील एकूण ०९ वाडयावस्त्यांमध्ये नाकाबंदी करण्यात आल्या आहेत.या वाडयांमध्ये एकूण १०२७ व्यक्ती असून डेरवण, जाळगेवाडी, चोरजवाडी,चाफळ उंब्रज, इंदोली येथील कोरोनाच्या हायरिस्कमध्ये एकूण ३१ व्यक्ती तसेच लो रिस्कमध्ये १४ असे एकूण ४५ व्यक्तींना तपासणीकरीता कृष्णा रुग्णालय येथे काल दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तपासण्यांचा रिपोर्ट आज येणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाकडून १२ लोकांमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत असून याठिकाणी महसूल, ग्रामविकास, आरोग्य विभागाचे एकूण २१ लोकांना कार्यरत करण्यात आले आहे. आमची सर्व शासकीय यंत्रणा सतर्क असून यापुढील काळामध्ये यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या असल्याचे सांगितले.


              यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले,१० महिन्याच्या मुलास कोरोनाची लागण होणे ही चिंतेची बाब आहे परंतू ही परिस्थिती आटोक्यात येईल,या विभागातील जनतेला सतर्क राहण्याबरोबर नाकाबंदीच्या काळात त्यांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांच्या पर्यंत पोहचविणे तसेच त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. या गांवात २४ तास वीजपुरवठा होईल, तसेच रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट सुरु राहतील,पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी तसेच या काळात या विभागातील ग्रामसेवक,विस्तार अधिकारी,तलाठी मंडलाधिकारी यांचे हेडकॉर्टर चाफळ करावे कधीही यांची गरज भासू शकते त्यामुळे महसूल आणि ग्रामविकास विभागाने या कर्मचाऱ्यांना आदेशित करावे.शासनामार्फत देण्यात येणारे स्वस्त धान्य तसेच मोफतचे तांदुळ या विभागात वाटप झाले नसल्यास तातडीने याचे वाटप गांवामध्ये जावून करण्याच्या सुचना धान्य दुकानदारांना तहसलिदारांनी कराव्यात. आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण करताना कोणा व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला जाणवू लागला तरी त्या व्यक्तींनी न घाबरता प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ कळवावे म्हणजे आवश्यक त्या उपाययोजना करणे शक्य होईल, आरोग्य विभागातील एक वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत या ०९ गांवातील लोकांची एकदिवसाआड आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी करावे असे ना.देसाईंनी यावेळी सुचित केले.


            या गांवाच्या पहाणीदरम्यान ना.शंभूराज देसाईंनी या वाडयावस्त्यांमधील जनतेला दिलासा देत कुणीही घाबरुन जावू नका,१० महिन्यांच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह येतील व आपल्यावर आलेले संकट दुर होईल अशी मला खात्री आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेणेकरीता आम्ही सर्वजण सतर्क आहोत तुम्ही घराबाहेर न पडता स्वत:ची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या असे त्यांनी यावेळी आवाहन केले.