वाढता वाढता वाढतेच आहे.. कराड तालुक्यात 71 तर जिल्ह्यात 92 रुग्ण... साखळी कोरोनाची कशी तुटणार ?
(गोरख तावरे)
कराड : कोरोना संसर्ग असणारी साखळी तोडण्यासाठी केला जाणारा शासनस्तरावरील प्रयत्न वाखाणण्याजोगा असला तरी काही केल्या कोरोना संसर्गाची साखळी तुटली जात नाही. कारण कराड तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित 12 रुग्ण आढळले यापैकी 8 वनवासमाची (ता. कराड) येथील तर 2 साकुर्डी (ता.कराड) येथील आहेत.
सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची 92 संख्या झाली आहे. वनवासमाची आगाशिवनगर येथील काही केल्या रुग्णांची संख्या कमी होईना तर दिवसेंदिवस या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढते ही गंभीर बाब आहे. केवळ कराड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 71 अशी झाली आहे. उर्वरित सातारा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या 21 आहे.
कराड तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने आता गंभीरपणे सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहेत. महसूल प्रशासन, पोलिस अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. या सर्वांना कोरोना व्हायरची साखळी तोडण्यासाठी अद्यापपर्यंत यश आलेले नाही. आता राज्यस्तरावरील एक चांगली कमिटी, तज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक सुविधा कराड येथे उपलब्ध करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनानेच पुढाकार घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.
कराड नजिक असणाऱ्या इस्लामपूर (ता. वाळवा) याठिकाणी प्रथमता कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ खबरदारी घेऊन राज्यस्तरावरून तज्ञ डॉक्टरांना पाचारण केले. सांगली - मिरज येथे अत्याधुनिक उपचार सेवा उपलब्ध केल्यामुळे इस्लामपूर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मर्यादित झाली. कोरोनाचा प्रसार न होऊ देण्यास इस्लामपूरला यश आले. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यात त्यांना यश आले आहे. हे शेजारचे उदाहरण पाहता याच पद्धतीने कराडमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.