किराणा माल, भाजीपाला आणि दूधपुरवठा तातडीने सुरु करा - आ. शिवेंद्रसिंहराजे


किराणा माल, भाजीपाला आणि दूधपुरवठा तातडीने सुरु करा - आ. शिवेंद्रसिंहराजे


सातारा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, सातारा शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गेल्या पाच दिवसांपासून प्रशासनाने सातारा शहर आणि आसपासचा परिसर पूर्णतः लॉक डाऊन केला आहे. यासाठी जनतेने प्रशासनाला  सहकार्य केले असून आता मात्र अन्नधान्य, भाजीपाला, दूध पुरवठा सुरु करण्याची मागणी जनतेने केली आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्ववत सुरु करावा अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मास च्या मागणीनुसार एमआयडीसीतील कंपन्या सुरु करण्याची मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. 


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. दरम्यान, पाच दिवसापूर्वी सातारा शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने सातारा शहर आणि आसपासची गावे पूर्णतः लॉक डाऊन केली. यामुळे किराणा माल, भाजीपाला, दूध या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला. गेले पाच दिवस जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला सातारकरांनी पूर्णतः सहकार्य केले आहे. मात्र आता किराणा माल संपला, भाजीला काही नाही, दूधही नाही अशा तक्रारी नागरिक करू लागले आहेत. लोकांना किराणा माल, भाजीपाला आणि दूध मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून शहरात दूध विक्री करणारे दूधवाले  पॅकिंग करत नाहीत आणि दुधवाल्यामुळे कोरोना झाला, असे  एकही उदाहरण नाही. त्यामुळे या सर्व अत्यावश्यक वस्तू लोकांना मिळाव्यात यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. यासाठी आवश्यक त्या निकषांचे पालन करून नागरिक प्रशासनाला नेहमीप्रमाणे सहकार्य करतील. 


त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक  निकष लावून अत्यावश्यक वस्तू लोकांना पुरवण्याची आवश्यकता आहे. भाजी मंडई सुरु करा असे कोणी म्हणत नाही मात्र पूर्वीप्रमाणे घरपोच भाजीपाला, फळे आणि दूध विक्री तातडीने सुरु करावी तसेच किराणा माल मिळण्यासाठीही पूर्वीप्रमाणे ठराविक वेळेसाठी संबंधित दुकाने सुरु करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. साताऱ्यात ५ रुग्ण असून त्यापैकी चार रुग्ण हे बाहेरगावाहून साताऱ्यात आले आहेत. एक रुग्ण आहे तोही आरोग्य कर्मचारी आहे. त्यामुळे स्थानिक कोणीही कोरोना बाधित नाही. तसेच ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत अशा हॉटस्पॉट मधील सेवा निकषानुसार बंद ठेवा मात्र इतर ठिकाणी लोकांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा सुरु करा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. 


केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुरास एमआयडीसीतील कंपन्या चालू करण्यास परवानगी दिली पाहिजे. यासाठी सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर आदी निर्बंध घालून मासाच्या मागणीनुसार साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या सुरु करण्यासही परवानगी द्यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडे केली असून या सर्व मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेऊ, असे सिंह यांनी चर्चेअंती सांगितले.