माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाणांची कोरोना विलगीकरणाला भेट


माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाणांची कोरोना विलगीकरणाला भेट


कराड: कोरोनाने कराड तालुक्याला चांगलाच विळखा घातला आहे. या परिस्थितीत कराड तालुक्यातील जनता भीतीच्या छायेत आहे. आपल्या भागात कोरोना बाधित सापडला किंवा विलगीकरण कक्षात जरी ठेवला तरी अश्या रुग्णांची त्यांचेच मित्र व शेजारी विचारपूस सुद्धा करीत नाहीत, कारण कोरोनाची जनतेच्या मनात असलेली भीती. अश्या परिस्थितीत कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पार्ले येथील शासकीय वसतिगृह, सैदापुर येथील फार्मसी महाविद्यालय व विजयनगर येथील कृषि महाविद्यालय या सर्व विलगीकरण कक्षातील रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या


आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे तसेच मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवराज मोरे, कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, अविनाश नलवडे, इंद्रजीत चव्हाण आदि उपस्थित होते.


 यावेळी आ. पृथ्वीराज बाबांनी विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या जेवणाच्या व्यवस्थेची पाहणी केली तसेच परिसराच्या स्वछतेची माहिती घेतली. विलगीकरण कक्षातील रुग्णाशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या अडचणी समजून घेत विलगीकरणाच्या सोयी सुविधांबद्दल उपयुक्त अश्या सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या तसेच तिथूनच जिल्हाधिकार्‍यांशी फोनवरून चर्चा केली. कोरोना विलगीकरणातील अनुमानित रुग्ण हे कराड तालुक्यातील आहेत, विलगीकरणातील अनुमानित रुग्णांनी पृथ्वीराज बाबांच्या भेटीने समाधान व्यक्त केले की, विलगीकरण कक्षात आम्हाला अगदीच एकटे एकटे वाटत होते अश्या मध्ये पृथ्वीराज बाबांनी प्रत्यक्ष येऊन आमची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व काहीही अडचण आली तर संपर्क साधण्यास संगितले आहे. या आमच्या लोकप्रतींनिधीच्या बोलण्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळाली आहे अशी भावना विलगिकरण कक्षातील अनुमानित रुग्णांनी व्यक्त केली.  


यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी लॉकडाउन सुरू झाले पासून कराडमध्येच आहे. सुरुवातीला मी मतदारसंघातील सरपंचांशी फोनवरून चर्चा करून गावातील परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर म्हारुगडेवाडी येथे कोरोना बाधित आढळल्यानंतर मी त्या भागाला भेट दिली तसेच मतदारसंघातील काही इतरही गावांना भेटी दिल्या की जिथे मुंबई – पुण्याचे लोक आलेत अश्या ठिकाणी. मी स्वत: ध्वनिक्षेपणाद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांची कोरोना बाबत जागृती केली. त्याचसोबत कराड व मलकापुर शहाराच्या भाजी मंडई मधील वाढती गर्दी पाहता तिथेही जाऊन जनजागृती केली. आता कराड तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढत्या संख्यामुळे कराड शहर व आसपासची 13 गावामध्ये लोकांची गर्दी वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत.


मी वेळोवेळी जिल्हाधिकारी, प्रांत व तहसिलदार यांच्या संपर्कात आहे. जनतेची माझ्याकडे आलेली समस्या मी प्रशासनाला सोबत घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. जिथे गरज पडेल तिथे मी राज्याच्या मुख्य सचिवांसोबत व सबंधित मंत्री व सचिवांसोबत चर्चा करीत आहे. मी कॉंग्रेस पक्षाच्या टास्क फोर्स समितीचा अध्यक्ष असल्याने राज्यातील ही समस्या माझ्याकडे येत आहेत. राज्यातील समस्यांविषयी मी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये काही समस्या सुटल्या देखील आहेत त्या म्हणजे कोरोना टेस्टिंगचा खर्च महात्मा फुले आरोग्य योजनेत समाविष्ट करावा, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत महाराष्ट्रात आणले जावे, वर्तमानपत्रांचे वितरण सर्वत्र सुरू करावे, शेतकर्‍यांनी मागील कर्जाचे हफ्ते न दिल्यास त्यांना नवीन कर्ज मिळावे, खते व बियाण्यांची दुकाने सगळीकडे सुरू केली जावी, कृषी मशीन, ट्रॅक्टर अश्याना सर्व पेट्रोल पंपावर डिझेल मिळावे जेणेकरून शेतीची कामे वेळेत होतील. अश्या जनतेच्या अनेक समस्यांची पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवून त्यामधील काही समस्यांवर अंमलबजावणी देखील झालेली आहे.