कराडमध्ये कोरोना फायटर्सचे काम होणार अचूक नागरी आरोग्य केंद्र थर्मामीटर, ऑक्सिमीटर, फेस शिल्ड, पीपीई किटने सज्ज


कराडमध्ये कोरोना फायटर्सचे काम होणार अचूक
नागरी आरोग्य केंद्र थर्मामीटर, ऑक्सिमीटर, फेस शिल्ड, पीपीई किटने सज्ज


कराड - कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कराड शहरात नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातर्फे 158 जणांचे पथक रोज घरोघरी सर्व्हे करत आहे. या पथकाकडून सर्दी, ताप, खोकल्यासह सारीच्या रूग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे. नगरपालिका या आरोग्य केंद्रास विविध सुविधा पुरवत असून नुकतेच डिजीटल थर्मामीटर, ऑक्सिमीटर, पीपीई किट आदी सामुग्री देण्यात आली आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्राचे काम आणखी अचूक व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे.


शहरातील सार्वजनिक आरोग्याची जपणूक करण्याची प्रमुख जबाबदारी नगरपालिकेकडे आहे. 2011 पासून नगरपालिकेने नागरी आरोग्य केंद्र सुरू केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरी आरोग्य केंद्राचे काम वाढले आहे. कराड लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराडसह 13 गावे कंटेनमेंट झोन जाहीर केली. या झोनमध्ये प्रत्येक गावात रोज घरोघरी सर्व्हे करून सर्दी, ताप, खोकल्यासह सारी रूग्णांची माहिती घेण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार कराड शहरात नागरी आरोग्य केंद्रातर्फे सर्व्हे सुरू आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, नागरी आरोग्य केंद्राचा स्टाफ असे एकुण 158 जण यासाठी काम करत आहे. यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. हे कर्मचारी घरोघरी भेटी देऊन रूग्णांची माहिती घेत आहेत. शनिवारअखेर शहरात सारीचे 2 व सर्दी, ताप, खोकल्याचे 20 रूग्ण आढळून आले आहेत.


कोरोनाच्या संसर्गजन्य वातावरणात आरोग्यकर्मी शहरात काम करत आहेत. या कर्मचाऱयांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी साधने पुरवण्याच्या सूचना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी पालिका अधिकाऱयांना केल्या होत्या. त्यानुसार रूग्णाच्या अंगाला हात न लावता ताप मोजता येणारे 12 डिजीटल थर्मामीटर पालिकेने खरेदी करून ते नागरी आरोग्य केंद्राला दिले आहेत. याचा उपयोग आरोग्य केंद्राची ओपीडी व सर्व्हे करणाऱया पथकाला होणार आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजणारे 5 ऑक्सिमीटरही पालिकेने खरेदी केले आहेत. याशिवाय पंचायत समितीही आरोग्य केंद्रास ऑक्सिमीटर देणार आहे. ऑक्सिमीटरच्या आधारे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणत लगेच कळणार असून हे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या रूग्णावर अधिक लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. सर्व्हे करताना तापाचे रूग्ण आहेत का, याची माहिती विचारण्यात येत होती. आता थेट थर्मामीटरच्या साहाय्याने तातडीने ताप मोजणे शक्य होणार आहे. तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रूग्णाला हात न लावता त्याचा ताप मोजता येणार आहे.  


याशिवाय वैयक्तिक सुरक्षेची सुमारे 50 किट पालिकेकडे आहेत. यातील किट आरोग्य कर्मचाऱयांना देण्यात आली आहेत. तर नागरी आरोग्य केंद्रासही देण्यात आली आहे. याशिवाय आणखी किट आरोग्य केंदास देण्याबाबत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सूचना अधिकाऱयांना केली असल्याचे केंद्राच्या प्रमुख डॉ. शीतल कुलकर्णी यांनी सांगितले.  


आरोग्य कर्मचाऱयांना सॅनिटायझर, हॅण्डवॉश, फेस शिल्ड आदी सामुग्रीही पुरवण्यात आली आहे. या सर्व सामुग्रीद्वारे कर्मचाऱयांना कोरोनापासून स्वत:चा बचाव करणे शक्य होणार आहे.