मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी


मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी


कराड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कडक प्रतिबंध लागू केले. याचे तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा पूर्ण प्रयास कराड नगरपरिषदेच्या प्रशासनाने केला. दरम्यान वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ व नियोजन शुन्य वैद्यकीय प्रशासनाने या सर्वावर पाणी फिरवले आणि कराडच्या वेशीवर येऊन थांबलेला कोरोना अखेर कराड शहरात आला. दररोजचे कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहिली तर मन सुन्न होत आहे. कारण रोज रुग्ण सापडत आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कराड नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र सेवा देत कोरोनापासून शहराचा बचाव केला होता. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारणार नाही.
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी यासाठी प्रचंड धडपड केली. अथक परिश्रम घेतले. शहरालगतच्या गावांमध्ये कोरोना बाधित रूग्ण वाढत असताना कराड शहरात युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात आल्याने एप्रिलअखेरपर्यंत शहरात कोविड बाधित रूग्ण आढळला नव्हता. कारण मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने केलेले नियोजन अत्यंत सुनियोजित होते. 


गेले दोन महिने सुरू असलेल्या या प्रयत्नांवर अखेर पाणी फिरले आहे. कराड शहराचे सर्व रस्ते कडेकोट बंद केले गेले. परंतु उपजिल्हा रूग्णालयातूनच कोरोनाचा शहरात शिरकाव झाला आहे. कोरोनाला कराड शहराच्या हद्दीवर रोखण्याचा आटोकाट प्रयत्न नगरपालिका प्रशासनाने केला. दरम्यान वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे ना ..ना.. करते.. करते अखेर कोरोना कराड शहरात आलाच. त्यामुळे शहरात अतिशय भीतीदायक वातावरण असून सर्वत्र सन्नाटा आहे.  


गेले दोन महिने कोरोनाबाबत राज्य सरकारकडून करण्यात येणाऱया सूचनांची अंमलबजावणी शहरात करण्यात नगरपालिका अग्रेसर होती. सार्वजनिक ठिकाणे बंद करणे, मंडई बंद करण्याचा व घरपोच भाजी विक्रीचा निर्णय शहरात प्रभावीपणे राबवण्यात आला. यासाठी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्नांची शिकस्त करीत होते. शहरात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मदत पोहोचवण्यातही नगरपालिकेने मोठी कामगिरी केली. पोलीस दल आणि नगरपालिकेने एकत्रपणे विचारविनिमय करून सर्वत्र सीमा सील केल्या. शहरात रस्तेही सील करण्यात आले. नागरी आरोग्य केंद्राकडून सर्व्हे होत होते. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कामाची धडाडी शहरवासियांना माहित आहे. 


कोरोनाचा शिरकाव शहरात होऊ नये, यासाठी ते अहोरात्र कार्यरत होते. मात्र शासनाच्या सूचनेनुसार वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात कोविड 19 कक्ष सुरू करण्यात आला. स्वॅब घेण्याची सोयही करण्यात आली. येथे रूग्णांवर उपचारही सुरू करण्यात आले. उपजिल्हा रूग्णालय प्रसूती विभागाकडे गोरगरिबांसह नागरिक उपचारासाठी येत असतात. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कराड शहराच्या मध्यवस्तीत असल्याने या ठिकाणी कोविड कक्ष नको, अशी मागणी होत होती. दरम्यानच्या काळात उपजिल्हा रूग्णालयात प्रसूती झालेल्या दोन महिलांसह सात आरोग्यकर्मींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. 


आता संबंधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सन्नाटा पसरला आहे. शहरातील अनेक नागरिक, संस्था, संघटनांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधून उपजिल्हा रूग्णालयात कोविड कक्ष ठेवू नये, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचे व वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्या कामाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.


कोरोना बाधित रुग्णांना ठणठणीत बरे करण्याचे काम कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने मोठ्याप्रमाणात करण्यात येत असून कृष्णा हॉस्पिटल येथे कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी अद्ययावत सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे. शासकीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील कोरोना बाधित रुग्णांच्यावर उपचाराबाबत विरोध करण्याचे काही कारण नाही. मात्र शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्यावर उपचार करणे योग्य आहे का ? याचा प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे.सह्याद्री हॉस्पिटल हे शहरापासून लांब असल्याने या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची चाचणी घेणे अथवा त्यांना उपचारार्थ दाखल करणे ही सुविधा अद्याप याठिकाणी उपलब्ध झालेली नाही. कृष्णा हॉस्पिटलमध्ये सध्यातरी कोरोना बाधित रुग्णांच्या वर यशस्वीपणे उपचार होत आहेत आणि आतापर्यंत अनेक रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत हे आशादायक चित्र आहे.
 
वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाई करावी-आनंदराव लादे


उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चुकीच्या पध्दतीने काम करत आहेत. याबाबत पालकमंत्र्यांचे कार्यालय, इन्सिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी दिघे यांच्याकडे फोनवरुन चर्चा केली होती. रुग्णालयात कोविड बाधित महिला उपचार घेत असताना तेथे 28 रोजी लहान मुलांचे लसीकरण घेण्यात येणार होते. लसिकरणाचा कार्यक्रम रुग्णालयामध्ये घेऊ नये, म्हणून विनंती केली. वैद्यकीय अधीक्षक हे स्वत:च्या प्रसिध्दीसाठी आरोग्य कर्मचाऱयांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे शहरामध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन, पोलीस, नगरपालिका प्रशासन, सामाजिक संस्था, पत्रकार, इलेक्टॉनिक मिडिया, नागरिक यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घेतलेले परिश्रम पूर्णपणे वाया गेले आहेत. वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाई करावी. रूग्णालयात सक्षम अधिकाऱयाची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.