काळीज पिळवटून टाकणारी सत्य  घटना.....

 


काळीज पिळवटून टाकणारी सत्य  घटना.....


         सुमारे ४ वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग आहे. रक्तातील साखरेची तपासणी करण्यासाठी  कराड शहरातील एका  लेबोरेटरी  मध्ये मी गेलो होतो. त्याठिकाणी एक महिला आपल्या मुलाला घेवून आली. .जवळची चिठ्ठी तिने लॅब चालकाला दिली . मावशी, या तपासणीसाठी ७०० रुपये खर्च येईल असे लॅब चालकाने  सांगितले. मुलाला काय होतंय  असे मी विचारताच ती म्हणाली,  दादा, लेकराला सारका ताप यीतुया,लीकरू लई खराब  झालंय,काय खात पित नाय, म्हणून कराड मदी डाक्टर ला  दावलाय. रगत तपसाय सांगितलंय असे म्हणून कमरेला अडकवलेला बटवा कादून तिने माझ्या हातात दिला.व म्हणाली,दादा, यात किस्त पैसं हायती बगा.मी जांभळं इकुन पैसं गोळा केल्याती.लेकराला बरं वाटावं म्हणून.....मी तो बटवा घेतला .त्यात १ ,२ ,५  रुपयाची चिल्लर  होती. मी पैसे मोजू लागलो. पैसे मोजून झाल्यावर सगळे मिळून  ४७० रुपये निघाले . त्यावर लॅब  चालक त्या महिलेला म्हणाला, अजून २३० रुपये घेऊन या,त्याशिवाय तपासणी होणार नाही. असे म्हणताच ती महिला काकुळतीला येऊन म्हणाली, आव सायेब, एवढच पैसं हायती माझ्याकडं, तुमच्या पाया पडते मी, बाकीचं पैसं मी ८ दिसाने आणून देते.. उधारी चालणार नाही.सगळे पैसे रोख दिले पाहिजेत असे लॅब चालकाने ठणकावले .


          हा सर्व प्रसंग मी पहात होतो. मला गहिवरून आले. मावशी, कोणते गाव तुमचे  असे  मी विचारताच तिने चांदोली भागातील एका खेडे गावाचे नाव सांगितले . नऊवारी  हिरवं लुगडं, कपाळाला ठसठशीत कुंकू, सडपातळ बांधा असा ग्रामीण खेडवळ पेहराव असलेल्या त्या महिलेचा मुलगा  १२ वर्षांचा होता . हुशार व चुणचुणीत होता असे त्याच्या बोलण्यावरून जाणवत होते. लेकरासाठी जीव तुटतो दादा, मालक आजारी  हायती, घरीच बसून असत्यात. मीच कायतर हातपाय हलवून परपंचा चालवते  असे ती म्हणाली.   मावशी, काळजी करू नका, वरचे २३० रुपये मी भरतो . तुम्ही मुलाची तपासणी करा ,मुलाची काळजी घ्या असे मी म्हणताच ती माझे पाय धरू लागली व बोलली, लई उपकार झालं दादा तुमचं,  मी म्होरल्या येळला कराडला आल्यावर  तुमचं पैसं दीन,तुम्ही कूट रहाता ती सांगा.असे म्हणत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ते पाहून मलाही गहिवरून आले. मावशी घाबरु नका, सगळं काही ठीक होईल  असं म्हणत मी तिला धीर दिला  व म्हणालो,  माझी बहिण समजून मी  तुम्हाला भाऊबीज दिली आहे  असे समजा. मला पैसे परत नकोत. दिवसभर जांभळं विकून ती महिला व तिचा मुलगा  दमलेली, भुकेलेली मला दिसली . मी रोडवर जाऊन  २ वडापाव घेऊन आलो  व त्यांना खायला दिले . आव ,कशाला आणलासा दादा,असे ती  लाजून म्हणताच ... खावा तुम्ही, पोराला भूक लागली असेल असे मी म्हणालो.  


    त्यानंतर माझा नंबर आल्यावर मी रक्त तपासणी साठी देऊन बाहेर आलो ..मावशी मी निघतो आता, मला अर्जंट काम आहे ,  तुम्ही मुलाची रक्त तपासणी करा, तो रिपोर्ट डॉक्टरला दाखवा,डॉक्टर औषधे देतील ती मुलाला व्यवस्थित द्या. मुलाची तब्बेत सांभाळा  असे बोलून  त्या महिलेचा निरोप घेऊ लागताच, दादा, तुमि आज देवासारखा भेटला,तुमचं लई उपकार झाल्याती आमच्यावर  असे ती बोलली. अहो, उपकार नाही,मी माणुसकीच्या भावनेतून माझे कर्तव्य केले आहे  असे सांगून  त्या माय लेकरांचा निरोप घेतला.आजही  हा प्रसंग आठवला तर माझ्या डोळ्यात अश्रू येतात. यातून समाजाला हेच सांगायचे आहे की, जीवन हे क्षणभंगुर आहे, माणुसकीची जाणं ठेवा. गोरगरिबांना  मदत करा. नुसता पैसा असून उपयोग नाही तर  दुसऱ्याला मदत करण्याची  भावना असावी लागते.



 श्री .दादासाहेब वसगडेकर, सामाजिक कार्यकर्ते,कराड,जिल्हा सातारा