कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित


महत्वाची बातमी...


कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग


कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित


कराड : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली असून, या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात येत्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. या वैद्यकीय चाचण्यांसाठी भारतातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांची निवड करण्यात आली असून, यामध्ये कराड येथील कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश आहे. जगभरात महत्वपूर्ण ठरणाऱ्या या कोरोना लस संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी कृष्णा हॉस्पिटलची निवड झाल्याने, कराडचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहचण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.


धनुर्वात, गोवर, डेंग्यू यासारख्या आजारांवरील लस शोधणाऱ्या पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘कोडाजेनिक्स’च्या मदतीने फेब्रुवारी महिन्यातच कोरोनावर मात करणारी लस विकसित करण्यास प्रारंभ केला आहे. या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ची मान्यता मिळाली आहे. देशातील 40 निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोवा येथील सुप्रसिद्ध ‘सी.आर.ओ.एम. क्लिनिकल रिसर्च ॲन्ड मेडिकल टुरिझम’ या एन.ए.बी.एच. मान्यताप्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.


अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर, तज्ज्ञ स्टाफ, वैद्यकीय संशोधनाचा दीर्घ अनुभव या निकषांच्या आधारे कृष्णा हॉस्पिटलची या महत्वपूर्ण संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व तज्ज्ञ संशोधक डॉक्टर्स या संशोधन कार्यात अमूल्य योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


या चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यात समाजातील उच्च जोखीम गटात मोडणाऱ्या; जसे की आरोग्य कर्मचारी, पोलिस, सुरक्षा गार्ड, भाजीपाल व फळ विक्रेते, किराणा माल विक्रेते यांचा अभ्यास केला जाणार आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. सुजाता पाटील, डॉ. अपर्णा पतंगे व डॉ. सुजाता जाधव या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून काम पाहणार असून, ‘सी.आर.ओ.एम.’चे संचालक डॉ. धनंजय लाड आणि डॉ. विजयकुमार पाटील हे सीरम इन्स्टिट्यूटच्यावतीने प्रकल्पाचे निरीक्षक म्हणून काम पाहतील. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार असून, वैद्यकीय चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर ही लस लवकरच सामान्य लोकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा सीरम इन्स्टिट्यूटचा मनोदय आहे.