कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी गिरवले व्हर्च्युअल क्लासेसचे धडे


कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी गिरवले व्हर्च्युअल क्लासेसचे धडे


कराड - Covid-19 च्या लॉक डाऊन चे अती गंभीर परिस्थितीमध्ये विद्यार्थिनी शाळेकडे येत नाहीत, शिक्षकांना शाळेत जाता येत नाही आणि त्यामुळे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेवर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसतो आहे. पण तरीही घरी राहून विद्यार्थी-विद्यार्थिनींना काही शिकायचं आहे. खासकरून इयत्ता दहावीची परीक्षा देण्यासाठी सज्ज असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनामध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. आमचे कसे होणार? आम्ही कसे शिकनार? अशा अनेकविध शंका घेऊन विद्यार्थी वावरताना दिसत आहेत.


शिक्षण मंडळ कराड संचालित , स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेमध्ये सातत्याने नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या मुख्याध्यापिका सौ शर्मिला बायस यांच्या मार्गदर्शनाखाली व्हर्च्युअल क्लासचे आयोजन करण्यात आले. प्रशालेच्या विद्यार्थिनीप्रिय विज्ञान शिक्षिका सौ ज्योती राऊत यांनी या व्हर्च्युअल क्लासचे यशस्वी नियोजन केले.
इयत्ता दहावीच्या वर्गातील एकूण 36 विद्यार्थिनींनी या व्हर्च्युअल क्लासमध्ये सहभाग घेतला. 'लाइफ प्रोसेस इन लिविंग ऑर्गानिस्म' हा घटक शिकविताना त्यांनी 'रिप्रोडक्शन' ही संकल्पना अत्यंत व्यवस्थितपणे समजावून दिली. त्यासाठी विविध तक्ते, चित्रे आणि आकृत्या यांचा व्यवस्थितपणे वापर करण्यात आला. दरम्यानच्या काळात विविध प्रश्न व उत्तरांच्या साहाय्याने त्यांनी विद्यार्थिनींना बोलते केले. 


पंचायत समिती कराडच्या शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय सौ. मुलानी मॅडम या ही या व्हर्च्युअल क्लाससाठी उपस्थित होत्या. "गंभीर अशा साथ रोगाच्या परिस्थितीमुळे प्रशालेपासून दूर असणाऱ्या विद्यार्थिनींना व्हर्च्युअल क्लासचे आयोजन करून आपण करीत असलेल्या अध्यापनामुळे त्यांच्यामध्ये निश्चितच परिवर्तन होईल", असे समाधान त्यांनी व्यक्त केले."तुमच्या या प्रशालेकडून अनेक शाळा प्रेरणा घेतील आणि त्याही अशा व्हर्च्युअल क्लासेसचे नियोजन करून अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणतील. परिणामी शाळेपासून दुरावलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत पडलेला दूरगामी खंड जाणवणार नाही. विद्यार्थीकल्याणासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल आपले मनापासून अभिनंदन" अशा शब्दांमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ शर्मिला बायस यांनी सांगितले की, "साथ रोगामुळे जरी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असली तरी, एक शिक्षक या नात्यांने आम्ही अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये खंड न पडण्याच्या दृष्टीने सक्षम आहोत. तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा वापर करून आम्ही आमच्या विद्यार्थिनींना अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये सामील करून घेणार आहोत.आमच्या प्रशालेचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका अशा प्रकारच्या व्हर्च्युअल क्लासेसचे आयोजन करून सर्व प्रकारचे घटक विद्यार्थिनींना शिकवू शकतात हा आत्मविश्वास आता सर्वांमध्ये आला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही अध्यापन करणार आहोत." 


शेवटी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ शर्मिला बायस यांनी सौ. मुलांनी मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड, यांचे मनापासून आभार मानले. त्याचबरोबर विद्यार्थिनींना त्यांच्या भावी अध्ययन प्रक्रियेबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या.