कराडमध्ये राजकीय-प्रशासकीय इच्छाशक्तीचा समन्वय कोरोनाचे जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांचे प्रतिपादन 


कराडमध्ये राजकीय-प्रशासकीय इच्छाशक्तीचा समन्वय


कोरोनाचे जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांचे प्रतिपादन 


कराड - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कराड शहरात जे काम गेले तीन महिने होत आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा चांगला समन्वय कराडमध्ये दिसत असून यामुळेच शहराचा कोरोनापासून करण्यात यश येत आहे. यापुढील काळातही डॉक्टर्सनी जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहन शासनाचे जिल्हा कोरोना संपर्क व समन्वय अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी केले.


कराड नगरपालिकेच्या सातव्या शहरस्तरीय सुकाणू समिती व प्रभाग समितीच्या सातव्या बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कराड शाखेचे अध्यक्ष डॉ. वैभव चव्हाण, डॉ. उदय काटकर यांची उपस्थिती होती.  


या बैठकीस शहरातील डॉक्टर्सना निमंत्रित करण्यात आले होते. शंभरावर डॉक्टरांनी उपस्थिती लावत चर्चेत भाग घेत समस्या मांडल्या. डॉ. वैभव चव्हाण यांनी डॉक्टर्सनी रूग्णसेवा करताना स्वत:ची आणि आपल्या रूग्णालयाच्या स्टाफची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी असणाऱया प्रतिबंधक साधनांची माहिती दिली. डॉ. लाहोटी यांनी, डॉक्टर्सना येणाऱया अडचणी सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी केली. डॉ. शहा यांनी, कराड हॉस्पिटल असोसिएशनतर्फे चालवल्या जाणाऱया वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून यासाठी पालिकेने सहकार्य करण्याची विनंती केली. डॉ. तेजस जाधव यांनी, पालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीत हॉस्पिटल्सना सवलत देण्याची मागणी केली. डॉ. भोकरे, विवेक ढापरे, डॉ. जोशी, डॉ. यादव, डॉ. कणसे, डॉ. ममता काळे यांनी विविध प्रश्न मांडले. कोविडची चाचणी करण्यासाठी खासगी लॅबना परवानगी देण्याची मागणी बहुतांश डॉक्टर्सनी केली. तर कोरोना रूग्ण तातडीने समजण्यासाठी ऍण्टीजन चाचणीची सोय करण्याची मागणीही डॉक्टर्सनी केली.  


डॉक्टरांच्या प्रश्नांवर प्रांत उत्तम दिघे, डॉ. प्रकाश शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी उत्तरे दिली. बाधित रूग्णांच्या संपर्कात आल्यास संबंधित डॉक्टर्स व स्टाफला सोय असेल तर त्याच्या रूग्णालयातच क्वारंटाईन करण्यात येत असल्याचे दिघे यांनी सांगितले.  


प्रांताधिकारी दिघे म्हणाले, सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. शासनानेही परवानगी दिली आहे. लग्नामध्ये गर्दी होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. पुणे-मुंबईहून येणारे लोक बाधित होत असल्याने या काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले की, शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवणे, डॉक्टरांनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. शासनाच्या अखत्यारित असणारे विषय जिल्हाधिकाऱयांसमोर मांडणार असल्याचे सांगितले. पुढील सोमवारच्या बैठकीस बीएएमएस, बीएएमएस व डेंटीस्टना बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व डॉक्टर्सनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.